चोवीस तासात अजितदादांचा राजीनामा झाला नाही तर दिल्ली गाठणार

अंजली दमानियांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा

by Team Satara Today | published on : 26 November 2025


मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. उद्याच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. असं झालं नाही तर मी अमित शाहांना दिल्लीत भेटून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करेन असंही म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या 40 एकर जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील घोळामुळे अजित पवारांवर टीका होते आहे. त्यांनी आपल्या मुलाला पाठीशी घातलं आहे, सत्तेचा दुरुपयोग केला आहे, पार्थवर गुन्हा दाखल का नाही केला, असे अनेक प्रश्न विरोधकांसह अंजली दमानियांनीही उपस्थित केले आहेत. याच व्यवहाराचा पाठपुरावा करताना आज अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या हाती आलेला डेटा महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा आहे. हे जे कोणी स्वयंघोषीत भाई- दादा आहेत. त्यांनी आत्ताच्या आत्ता जमिनींची होणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

पार्थ पवारांची कंपनी अॅमेडियाने फ्रॉडवर फ्रॉड केले आहेत. या कंपनीने एक डेटा सेंटर सुरु करायचे आहे, असे सुरुवातीला एलओआय करताना सांगितले आहे. जमीन विकत घेण्याचा विषयही काढलेला नाही. आम्ही जमीन विकत घेतोय स्टॅम्प ड्युटीवर आम्हाला सूट द्या, अशी मागणी कुठेच नाही. कंपनीचे कागदपत्रे देताना त्यात आम्ही ९८ लाख रुपये गुंतवून डेटा सेंटर सुरु करतोय असं म्हटलं आहे, असं अंजली दमानियांनी यावेळी सांगितलं आहे. ती ४० एकर जागा ही शितल तेजवानीच्या नावावर आहे. ती आम्ही डेटा सेंटर उभारण्यासाठी ५ वर्षांसाठी लीजवर घेत आहोत, असं दाखवून एलओआय घेतलं आणि जी मोठी स्टॅम्पड्युटी लागणार होती ती फक्त ५०० रुपये भरली, अशी पळवाट काढून यांनी मोठा फ्रॉड केला आहे, असे कित्येक व्यवहार झाले असतील आणि होऊ शकतात, असा खळबळजनक खुलासा अंजली दमानियांनी केला आहे.

हे सगळं घडल्यानंतर ते जागेचा ताबा घेण्याचाही व्यवहार केला गेला. तृप्ता ठाकुर या वकिलांनी ही मागणी केली. कलेक्टरांना केंद्रीय प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जमिनीवर ताबा घेण्यासाठी कोणी येतंय, कलेक्टरांनी ही सगळी माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली नव्हती का? कलेक्टरांना तहसीलदारांनी जमीनीची विक्री झालेली कळवलं होतं, असं असताना 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार झाल्याचं जूनपासून नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्र्यांना कलेक्टरांनी सांगितलं नाही, असं होऊ शकतं का? असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशीही विनंती केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी समिती बरखास्त करा आणि नवी एसआयटी गठीत करा, अशीही मागणी केली आहे. २४ तासात अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर मी दिल्लीला जाणार आहे. गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. त्यांनी भेट नाही दिली तर तिथेही मी जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत ठाण मांडून बसणार आहे, असं म्हटलं आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट उद्ध्वस्त; सातारा भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या दोन्ही भावांसह ९ जणांना अटक
पुढील बातमी
बरड गावच्या हद्दीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

संबंधित बातम्या