सातारा : गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याला तडाखा देणार्या वळीव पावसाने गुरुवारपासून संततधार बरसायला सुरुवात केली आहे. आखाड महिन्यातील पावसासारखे वातावरण तयार झाले असून दरडी कोसळायलाही सुरूवात झाली आहे. परळी-ठोसेघर मार्गावरील बोरणे घाटात दरड कोसळली. दरम्यान, या पावसाने जनजीवन चिंब भिजून गेले आहे.
सातारा जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. पावसामुळे शहर व परिसरातील वर्दळीच्या रस्त्याना ओढे व नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटे पावसाने उघडीप दिली असली तरी गुरूवारी सकाळपासूनच पावसाची संततधार कायम आहे. दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
परळी- ठोसेघर रस्त्यावर ज्ञानश्री कॉलेजजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. तर कारंडवाडी ता. सातारा येथील एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. कंपन्यांमध्ये पाणी गेल्याने साहित्य व उत्पादन केल्या माल भिजल्याने लाखोचे नुकसान झाले आहे.
सध्या ग्रामीण भागात उन्हाळी भुईमूग काढणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र. पावसामुळे शेतात चिखल झाला असल्याने भुईमूग काढणीत व्यत्यय येत आहे. ठिकठिकाणच्या शेतात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी शेताचे बांध व ताली फुटून माती वाहून गेली आहे. पावसामुळे शहर व परिसरात अनेक ठिकाणी नाले ,गटारे तुंबल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. सकाळपासून तसेच डोंगर रांगा परिसरात दाट धुकेही पडले होते. त्यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले होते. त्यामुळे सातारा शहर व परिसरातील नागरिकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ठोसेघर, कास, चाळकेवाडी, सज्जनगड, यवतेश्वर, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर , पाचगणी येथे गर्दी केली होती.
सातारा जिल्ह्यात गुरूवारी सातारा 34.9 मि.मी, जावली 4.1 मि.मी., पाटण 30. 8 मि.मी., कराड 33.8 मि.मी., कोरेगाव 34.7 मि.मी., खटाव 34.5मि.मी., माण 34.3मि.मी., फलटण 24.3 मि.मी., खंडाळा 25.9 मि.मी., वाई 35.1 मि.मी., महाबळेश्वर 55.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.