वाईत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३६ अर्ज तर पंचायत समितीसाठी ४५ उमेदवार रिंगणात; राजकीय वातावरण चांगलेच तापले

by Team Satara Today | published on : 22 January 2026


वाई : वाई येथे पंचायत समिती, जिल्हा  परिषद निवडणुकीसाठी  फॉर्म भरणीच्या अंतिम दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार गटासाठी ३६ अर्ज तर पंचायत समिती आठ गणासाठी ४५ उमेदवार रिंगणात असून एकूण अपक्षांसह ८१ अर्ज दाखल झाले आहेत. वाई तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना (उद्धव/शिंदे गट) तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

बुधवार दि. २१ रोजी सकाळी आकरा वाजेपासून तहसील कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्ते, उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला होता. तसेच प्रत्येक पक्षाने उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून भरले. अंतिम क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची चुरस सुरू होती.

या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने अभेपुरी गण आणि भुईंज गटात जुनेच उमेदवार दिले आहेत. तर भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मागील निवडणुकांतील निकाल, सध्याची राजकीय समीकरणे आणि स्थानिक प्रश्नांमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवेळेस राष्ट्रवादीचे चारही जिल्हा परिषद गटात उमेदवार निवडून आले तर बावधन गणात काँग्रेस उमेदवार निवडून आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत होती. परंतु सध्या राजकीय गणित बदलली असल्याने यावेळी शेवट पर्यन्त वाट पहावी लागणार आहे.  

दरम्यान, अपक्ष उमेदवारांचीही लक्षणीय संख्या असल्याने अनेक मतदारसंघांत ते निर्णायक भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता उमेदवारी अर्ज छाननी, माघारी आणि चिन्ह वाटपानंतर प्रचाराला वेग येणार असून, वाई तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या संघर्षामुळे अधिक रंगतदार ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरफोडीमधील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आठ लाख 66 हजाराचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी ३८ नामनिर्देशन दाखल, राजकीय वातावरण तापले

संबंधित बातम्या