खाजगी सावकारांकडून 146 तोळे सोन्याचे दागिने जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त कारवाई

by Team Satara Today | published on : 05 December 2024


सातारा : सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकारांकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 तोळे वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत एक कोटी 16 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाधिक्षक आश्लेषा फुले यांनी दिली.

याबाबत दोन फिर्यादींनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुषंगाने या दोन्ही प्रकरणात विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी, अजिंक्य अनिल चौधरी यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात फिर्यादी मनोज गणपती महापरळे यांनी आरोपीकडून वेळोवेळी एक कोटी 92 लाख रुपये रक्कम पहिल्यांदा अडीच टक्के व्याजाने नंतर दहा टक्के व्याजाने घेतली. त्या रकमेस फिर्यादी याचेकडून 65 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 50 लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण  ठेवण्यात आला. 2018 ते 2023 यादरम्यान फिर्यादीने आरोपीला एक कोटी 92 लाख व व्याज एक लाख कोटी बारा लाख 77 हजार असे तीन कोटी चार लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे रुपये दिले. तरी संबंधितांनी सोन्याचे दागिने आणि प्लॉट परत दिला नाही. त्यावरून फिर्यादीने सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती.

दुसर्‍या प्रकरणात मयत फिर्यादी शकुंतला अशोक शिंदे यांनी आरोपी यांचे कडून 19 लाख 98 हजार रुपये रक्कम अडीच टक्के व्याजाने घेतली होती. त्याकरिता 81 तोळे वजनाचे दागिने गहाण ठेवले होते. फिर्यादीने आरोपीला वीस लाख 48 हजार 931 रुपये देऊनही 81 तोळे दागिने परत करण्यात आले नाहीत. यावरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक आश्लेषा फुले यांनी हा तपास सुरू केला. करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाची मदत घेण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून साक्षीदार यांच्याकडे सखोल तपास केला. यानंतर संबंधित आरोपींच्या विरोधात सबळ पुरावा प्राप्त करण्यात आला व दोन्ही गुन्ह्यातील खाजगी सावकार विजय चौधरी याच्याकडील असणारे 146 तोळे वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात सातार्‍यातील दोन सराफांना नोटीस बजावण्यात आली आहे.

या दागिन्यांची किंमत एक कोटी 16 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.

या तपासामध्ये पोलीस अंमलदार प्रमोद नलावडे, राजू मुलाणी, विकास इंगवले, सुरज गवळी, संजय गोरे, संतोष राऊत, स्थानिक गुन्हे शाखेकडील आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, निलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, अरुण पाटील, अमित माने, गणेश कापरे, अमित सपकाळ, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम यांनी सहभाग घेतला.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रयत शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी संमेलनाचे सातार्‍यात आयोजन
पुढील बातमी
गोडोली येथील घरफोडीतील अट्टल गुन्हेगार सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या