सातारा : सातारा पालिका कामगार युनियनचे माजी सरचिटणीस शिवाजी यदु पवार यांचे रविवार, दि. 22 रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते.
शिवाजी पवार हे शेळकेवाडी येथे राहत होते. गेली 51 वर्षे सातत्याने लाल बावटा कामगार युनियन यांच्या माध्यमातून चतुर्थ श्रेणी साफसफाई आणि अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नांवर वाचा फोडून त्यांनी प्रामाणिकपणे लढा दिला. स्व. एड. डीव्ही पाटील यांच्या नेतृत्वात शिवाजी पवार यांनी अनेक वर्षे सातारा नगरपालिका कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून कार्य केले.
अलीकडच्या काळामध्ये प्रकृतीबिघडल्यामुळे सक्रिय समाजकारणातून त्यांनी विश्रांती घेतली होती. रविवारी सकाळी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवाजी पवार यांच्या निधनाने कामगार संघटनेच्या चळवळीचा मोठा इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.