भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबर अखेर काम पूर्ण करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 14 July 2025


सातारा :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.

दौलतनगर ता. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात मिरगाव ता.पाटण येथील ग्रामस्थांचे भूस्खलनामुळे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आदी उपस्थित होते. 

मिरगाव येथील जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाल्याने 147 कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 47 कुटुंबे पूर्णतः भूस्खलीत झाली आहेत. 98 कुटुंबाचे स्थलांतरित निवारा शेडमध्ये तात्पुरता स्वरुपात करण्यात आले आहे. या बाधित कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन करण्याचे काम शासन करीत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, येत्या डिसेंबरअखेर किमान 100 घरांची कामे तात्काळ पूर्ण करून बाधित कुटुंबांना ताबा देऊन पुनर्वसित करावे. तसेच उर्वरित काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. या कामात विलंब लावू नये. बांधकाम पूर्ण करण्याच्या कामात अडवणूक करणाऱ्यां विरोधात पोलिस विभागाचे सहकार्य घेऊन कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिल्या.

 बैठकीस संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, बाधित कुटुंबातील प्रमुख उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
पक्षाची एकजूट कायम ठेवा : ना. शिवेंद्रराजे

संबंधित बातम्या