सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीच्या आजच्या निर्णायक दिवशी अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. दोन - दोन मंत्र्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या सदस्यांना खेचून घेण्याच्या प्रकारावेळी झालेल्या झटापटीत खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले. अशा तप्त वातावरणात बहुमत गाठीशी नसतानाही भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष व शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी राजूभैय्या भोसले यांची निवड झाली. मात्र या निवडीमध्ये भाजपने डर्टी गेम केल्यामुळे लोकांच्या जनादेशाला भाजपने सुरुंग लावल्याची चर्चा आज जिल्हा परिषद परिसरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये होती.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडणूकपूर्व युती केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिंदे गटाला मिळून ३५ जागा मिळाल्या होत्या. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी पुरस्कृत एका पक्ष व काँग्रेसच्या एका सदस्याचा त्यांना पाठिंबा होता. ६५ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३३ सदस्यांची आवश्यकता असताना या युतीकडे ३७ सदस्य होते. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत २७ जागा मिळाल्या होत्या. तरीही काही झाले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा भाजपचा अट्टाहास होता. आज अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने ते खरे करून दाखवले.
अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपकडून दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या सदस्यांना सहलीवर पाठवले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही फिल्डिंग लावली होती. मात्र अखेरच्या दोन दिवसात भाजपने गेम फिरवला. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन आणि शिंदे गटाच्या दोन सदस्यांनी व्हीपचे उल्लंघन केल्याचे समोर झाले. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या अनिल देसाई व संदीप मांडवे या दोन सदस्यांविरुध्द ऐनवेळी गुन्हे दाखल करून त्यांना आजच्या निवडणूक प्रक्रियावेळी ताब्यात घेतले गेले व मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवले. या सगळ्या हाय व्होल्टेज ड्राम्यावेळी भाजपकडून खुद्द मंत्री शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांच्या संरक्षणात मतदानासाठी सभागृहात निघालेल्या सदस्यांना खेचून देण्याचा प्रकार घडला. त्यावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळात, धक्काबुक्कीत शंभूराज देसाई यांच्या हाताला इजा झाली. या सिनेस्टाईल थरारनाट्यामुळे काहींचा बीपी वाढल्याचे सांगितले जात होते. अशा गोंधळात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली. या निवड प्रक्रियेवेळी जिल्हा परिषदेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पत्रकारांनाही या प्रक्रियेच्या वार्तांकनासाठी सोडले जात नव्हते.
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, खासदार नितीन पाटील यांनी घटनेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपचा तीव्र शब्दात धिक्कार केला. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील तसेच जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य उपस्थित होते.
सुरुवात तुम्ही केली; शेवट आम्ही करू
या प्रकरणात भाजपने पोलीस आणि प्रशासनाचा पुरेपूर वापर करत सत्ता बळकावली आहे. जिल्ह्यातील जनता या नीचपणाचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. भाजपने सुरुवात केली आहे, मात्र शेवट आम्ही करू असा निर्वाणीचा इशारा शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. भाजपने हे अत्यंत हीन पातळीचे राजकारण केले असून नीचपणाचा कळस करत लोकशाहीचा गळा घोटला आहे अशी कडवट टीका देसाई यांनी केली. याप्रकरणी आम्ही अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागू असे सांगून, जिल्हाधिकारी यांच्या समक्ष दांडगाई चा प्रकार घडल्यामुळे जिल्हा प्रशासनावर आणि पोलिसांवर एफआयआर दाखल करणार आहोत. जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत आहोत असे त्यांनी सांगितले.
सत्ता मिळवण्याचा घृणास्पद प्रकार
आसुरी पद्धतीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्याचा झालेला प्रयत्न घृणास्पद असल्याची संतप्त प्रतिक्रिया मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. मंत्री, आमदार, खासदार असताना त्यांच्यासमोर पोलीस बळाचा वापर केला गेल्याने या जिल्ह्याची परंपरा पायदळी तुडवली गेली आहे. जिल्ह्यातील जनता याची सजा दिल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
बंदोबस्त आकलनाच्या पलीकडचा
शंभूराज देसाई यांनी झालेल्या थरारनाट्याचा घटनाक्रम सांगितला. आज निवड प्रक्रियेसाठी आमच्या ३३ सदस्यांना घेऊन सभागृहाकडे जात असताना संपूर्ण इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये दोनशे पोलीस साध्या वेशात तैनात होते. पोलिसांचा इतका बंदोबस्त माझ्या आकलनाच्या पलीकडचा होता. मी व मकरंद पाटील कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा साताऱ्याचे पोलीस आमच्याशी प्रचंड दांडगाईने वागले. जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे याला सभागृहाकडे घेऊन जात असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लिफ्टच्या दारात रोखून त्याला एका बाजूला नेले. त्यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते व नगरसेवक फिरोज पठाण होते. निवड प्रक्रियेच्या वेळी सुद्धा कामेश कांबळे यांना मतदानासाठी जबरदस्तीने हात वर करायला लावण्यात आला असे त्यांनी सांगितले.
रस्त्यावर उतरून संघर्ष करणार
भाजपने ही निवडणूक जिंकलेली नाही. त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून व बळाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना अटक करून त्यांना जबरदस्तीने महाबळेश्वरला नेण्यात आले. त्यांच्यावर तत्पूर्वी सदस्याच्या अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. सदस्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन माझे कुणीही अपहरण केले नाही असे सांगूनही पोलिसांनी दाद घेतली नाही. दुसऱ्यांदा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना महाबळेश्वरला नेण्यात आले जेणेकरून ते माघारी मतदानासाठी येऊ नये. म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल तर तो तुरुंगातून मतदान करू शकतो आणि जे सदस्य मतदानासाठी सभागृहात जाऊ इच्छितात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न होतात याचा अर्थ प्रशासन आणि भाजप यांच्या अर्थपूर्ण राजकारण दडलेले आहे असा आरोप शशिकांत शिंदे यांनी करत यासंदर्भात रस्त्यावर उतरून शेवटपर्यंत न्यायालयीन संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला.