सातारा : रहिमतपूर, तालुका कोरेगाव येथील तक्रारदार मयूर मोहन शेडगे वय 30 यांची टेलिग्राम चैनल वरून अज्ञाताने विशिष्ट टास्क देऊन 33 हजार 500 रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात यश मिळवले आहे.
याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी यशस्वी तपास केला. मयूर शेडगे यांनी 17 जानेवारी 2025 रोजी सायबर फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. नमूद फिर्यादी नुसार टेलिग्राम चॅनेल वरून जॉब देतो, असे बोलून अज्ञात व्यक्तीने टास्क दिला होता. तो टास्क पूर्ण करून संबंधित व्यक्तीने शेडगे यांना काही रक्कम व त्याचे व्याज पाठवून दिले. अज्ञाताने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दुसर्या टास्कच्या माध्यमातून त्यांच्याकडून 33 हजार पाचशे रुपये उकळले. मात्र यावेळी त्यांना रक्कम परत मिळाली नाही. फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तक्रार दिली होती.
सचिन कांडगे यांच्या निर्देशाप्रमाणे रहिमतपूर पोलिसांनी या तक्रारीचा कौशल्यपूर्ण तपास केला. याबाबत दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणात फिर्यादीचे बँक खाते गोठवण्यात आले. तसेच न्यायालयाचे आदेश प्राप्त करून तक्रारदाराची फसवणूक झालेली रक्कम पुन्हा माघारी देण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या तपासाबाबत रहिमतपूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. सायबर विभागाचे दीपक देशमुख यांनी या तपास कामात सहकार्य केले.
ऑनलाईन फसवणूक झाल्याची लक्षात आल्यास संबंधित तक्रारदारांनी 1930 या क्रमांकावर तक्रार नोंद करण्याचे आवाहन सायबर विभागाच्या सूत्रांनी केले आहे.