कराड : शहरात दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसतानाही मिरवणूक काढल्याबद्दल दोन, तर वेळेपेक्षा जास्त वाद्य वाजवल्याबद्दल दोन अशा चार मंडळांवर कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गत तीन दिवसात पोलिसांनी दहा मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील बुधवार पेठेतील जय महाराष्ट्र मंडळ, लाहोटीनगर-मलकापूर येथील समर्थ मंडळ या दोन मंडळावर परवानगी नसताना मिरवणूक काढल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर सैदापूर येथील शेतकरी मंडळ तर कार्वेनाका येथील स्वराज मंडळावर वाद्य वाजवण्याची वेळ न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
दसर्यापासून दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. गत तीन दिवसात पोलिसांनी दहा मंडळांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी तीन, दुसर्या दिवशी तीन व शनिवारी रात्री चार मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन मंडळे परवानगी नसताना मिरवणूक काढल्याबद्दल पोलिसांच्या रडावर आली.
लाहोटीनगर-मलकापूर येथील समर्थ मंडळ व बुधवार पेठेतील जय महाराष्ट्र मंडळ अशी त्या मंडळांची नावे आहेत. त्या दोन मंडळामध्ये गतवर्षी मारामारी झाली होती. त्यामुळे त्यांना पोलिसांनी यंदा परवानगी नाकारली. मात्र, तरीही या दोन्ही मंडळांनी मिरवणूक काढल्या. वाद्य वाजवण्याची वेळ दहा वाजेपर्यंत असताना वेळ संपूनही कार्वेनाका येथील स्वराज्य नवरात्र मंडळ व सैदापूरच्या शेतकरी मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत. ध्वनीक्षेपकाचे आणखी काही प्रस्ताव पोलीस तयार करत आहेत. त्यानुसार अन्य काही मंडळांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.