मुंबईत महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपाने शिंदे सेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा

by Team Satara Today | published on : 17 December 2025


मुंबई :  महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात मुंबईत महायुतीची पहिलीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीत भाजपाकडून अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित होते तर शिंदेसेनेकडून योगेश कदम, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे यांचा समावेश होता. मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसेल असा दावा नेते करत आहेत. मात्र जागावाटपात भाजपा आणि शिंदेसेनेत रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. भाजपाकडून मुंबईत केवळ ५२ जागा शिंदेसेनेला सोडण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र ही अफवा असल्याचा दावा शिंदेसेनेचे मंत्री करत आहेत. 

मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागांपैकी किमान १५० ते १७५ जागा भाजपाने लढवाव्यात असा नेत्यांचा चंग आहे. मात्र शिंदेसेनेकडूनही सन्मानपूर्वक जागेचे वाटप व्हावे अशी मागणी केली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भाजपाच्या दादर येथील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाने शिंदेसेनेला ५२ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ साली मुंबईत शिवसेनेचे ८७ हून अधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ४७ नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे या जागांशिवाय आणखी काही जागा शिंदेसेनेला सोडण्याची तयारी भाजपाची आहे. भाजपाने मागील निवडणुकीत ८२ जागा जिंकल्या होत्या. त्या वार्डासह अन्य वार्डातही भाजपा उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई महापालिकेत २२७ वार्डातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. खुद्द एकनाथ शिंदे यावर लक्ष ठेवून आहेत. शिंदेसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतीची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे. त्यासाठी अर्ज वाटपही करण्यात आले आहे. त्यात महायुतीच्या पहिल्या बैठकीत शिंदेसेनेला भाजपाने ५२ जागांचा प्रस्ताव दिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आहे. त्यातही मुस्लीम बहुल भागात शिंदेसेनेला जागा सोडण्याची तयारी भाजपाने केली आहे. अलीकडेच एका सर्व्हेत एकनाथ शिंदे मुस्लिमांमध्ये लोकप्रिय झाले आहेत अशी बातमीही समोर आली होती. त्यामुळे महायुतीत जागावाटप नेमकं कसे होणार हे येत्या एक दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, माध्यमांत बरेच काही येईल. एवढ्या जागा मागितल्या, एवढ्या जागा मिळाल्या पण त्यावर काही विश्वास ठेवू नका. आपल्याला सन्मानजनक जागा मिळतील. शिवसेनेचा सन्मान राखला जाईल असेच होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत जागावाटपातील बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. त्याशिवाय ५२ जागांचा प्रस्ताव अफवा  असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दक्षता व नियंत्रण समितीकडील अत्याचारविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
१९ तारखेला काहीतरी स्फोट होतोय हे नक्की, त्यामुळेच भाजपच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितले : खा. संजय राऊत

संबंधित बातम्या