शरद पवारांनी पुन्हा भाकरी फिरवली; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबईतील बैठकीत जयंत पाटील यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

by Team Satara Today | published on : 15 July 2025


सातारा : माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा भार कोणाला दिला जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी राहणार आहे.

आज मुंबई येथे वाय बी चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आणि महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण केले. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांचा नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.

देशमुख यांच्या प्रस्तावाला सुनील भुसारा यांच्याकडून अनुमोदन देण्यात आले. तसेच उत्तम जानकर यांनी सुद्धा या नावाला अनुमोदन दिले. त्यानंतर शरद पवार यांनी या प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. अमोल कोल्हे यांनीही शशिकांत शिंदे यांच्या नावाला पाठिंबा दिला. निवडणूक प्रक्रियेमध्ये शशिकांत शिंदे यांचे एकच नाव आले आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.

मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या या विनंतीला शरद पवार यांनी मान दिला आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगते आहे. याबाबत अजूनही राजकीय सस्पेन्स कायम आहे. दरम्यान राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. असे असताना शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आलेली आहे. या निवडणुकीत पक्षाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आवाहन आता त्यांच्यापुढे असणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे पृथ्वीवर आगमन
पुढील बातमी
खंडित वीज पुरवठ्याचा शाहूनगरवासीयांना फटका

संबंधित बातम्या