सातारा : जिल्ह्यातील यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. जिल्ह्यात सध्या रब्बीची पेरणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत ३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे, तर दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने पेरणीला वेग येणार आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख पीक हंगाम घेण्यात येतात, तर उन्हाळी हंगामातील क्षेत्र सर्वात कमी असते. खरिपाचे सर्वसाधारणपणे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते, तर खरिपाच्या तुलनेत रब्बी क्षेत्र कमी असते. यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार २१० हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये ज्वारीचे १ लाख ३५ हजार ५२ हेक्टर, गहू ३७ हजार ३७४ हेक्टर, मका १० हजार २१०, हरभरा २७ हजार ७५४ असे प्रमुख पिकांचे क्षेत्र राहू शकते, तर करडई, सूर्यफूल, तीळ या पिकाखालील क्षेत्र अत्यल्प असते. जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. आतापर्यंत रब्बीची ६ हजार ५०८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी सर्वाधिक आहे. सध्या ४ हजार ४६९ हेक्टरवर ज्वारी पेर आहे, तर गव्हाची १२ हेक्टर, मका १ हजार ८७१, हरभरा ८२ हेक्टरवर घेण्यात आलेला आहे.