सातारा जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा बिगुल वाजला; जिल्ह्यात आचारसंहिता लागू ,16 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

by Team Satara Today | published on : 13 January 2026


सातारा : लागणार...  लागणार...   लागणार...  म्हणून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा बिगुल अखेर आज वाजला .राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सातारा जिल्ह्यात दिनांक 16 जानेवारी पासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्यक्ष मतदान हे ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

यानिमित्ताने सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारपासून जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली असून तत्पूर्वी दिवसभर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागांमध्ये प्रशासकीय मान्यतेची झुंबड उडाली होती. भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या घटक पक्षांनी सुद्धा राजकीय रणनीती गतिमान केली असून लवकरच शिंदे गट शिवसेनेचा मेळावा सातारा जिल्ह्यात होणार असल्याची माहिती आहे .राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आचारसंहितेचा कार्यक्रम पत्रकार परिषदेत जाहीर केला दिनांक 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांनी अर्ज दाखल करावयाचे असून त्याची छाननी दिनांक 22 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे मंगळवार दिनांक 27 जानेवारी पर्यंत अर्ज माघारी घ्यावयाचे आहेत .27 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता चिन्ह वाटप होणार असून प्रत्यक्ष मतदान 5 फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी ही 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सर्वाधिक 12 त्यानंतर सातारा तालुक्यात आठ आणि पाटण तालुक्यामध्ये सहा गट आहेत.त्यामुळे या तीन तालुक्यांवर महायुतीच्या सर्व घटक पक्षांची बारकाईने नजर राहणार असून भारतीय जनता पार्टीने विशेषता कराड उत्तर कराड दक्षिण आणि सातारा या चार तालुक्यांमध्ये भाजपचे वर्चस्व राहील या दृष्टीने प्रदेश कार्यकारिणीची आखणी सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित दादा पवार राष्ट्रवादी गट या दोन्ही गटांनी सुद्धा आपापली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या महिन्यात तीन मेळाव्यांचे आयोजन केले असून पुढील पंधरा दिवसांमध्ये दोन प्रचंड मिळावे घेण्याचे नियोजन आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज करावेत यासाठी पक्षाच्यावतीने आदेश बजविण्यात आलेला आहे.

महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीची जिल्हा कार्यकारणीची बैठक बोलावली असून यामध्ये तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. पाटण तालुक्यामध्ये शिंदे गटाने यापूर्वीच वेगवेगळे मेळावे घेऊन वातावरण निर्मितीमध्ये चांगलाच रंग भरला आहे .यंदा सुद्धा जिल्ह्यामध्ये महायुती समन्वयाने निवडणुकांना सामोरे जाईल या दृष्टीने पालकमंत्री शंभूरा प्रचंड आशावादी आहेत .याला भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कसे प्रतिसाद देतात यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत .सातारा जिल्हा परिषदेवर आजपर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रामुख्याने राहिले आहे यावेळी पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकांचे यश आजमावल्यानंतर भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने कंबर कसून तयारीला लागली आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये सायंकाळी चार नंतर आचारसंहिता लागू झाली असून तत्पूर्वी दुपारी तीन वाजेपर्यंत 135 प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. सर्व विभागांना याबाबतचे आदेश देण्यात आलेले असून आचारसंहितेच्या संदर्भातील सर्व आढावा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी घेतला आहे. या निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान 5 फेब्रुवारी पर्यंत त्यानंतर अहवाल प्रसिद्धी साधारण 10 फेब्रुवारी नंतर पुन्हा प्रशासकीय कामकाज सुरू होईल अशी चिन्हे आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर पोलिसांची मोठी कामगिरी; ९ लाख ६० हजार रुपये किमतीचे चोरी झालेले व हरवलेले ५३ मोबाईल हस्तगत
पुढील बातमी
सातारा शहरात रणरागिणींचे स्मारक उभे करावे - विकास गोसावी ; महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले निवेदन

संबंधित बातम्या