नवी मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात बुधवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने पाच वाहनांना अक्षरशः चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक अवजड कंटेनर थेट कारवर उलटल्याने गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळी ९:४० च्या सुमारास खोपोली बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या कंटेनरवरील चालक अवधेश यादव याचे नियंत्रण सुटले आणि हा कंटेनर समोर असणाऱ्या वाहनांना काळ बनून धडकला. कंटेनरने सुरुवातीला एका कारला उडवले, त्यानंतर दुसऱ्या कारसह एका आयशर टेम्पोला भीषण धडक दिली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, समोर असलेल्या एका एसयूव्ही कारला जोरात धडक देऊन हा अवाढव्य कंटेनर थेट त्या कारवरच आडवा झाला. या साखळी अपघातात पुढे असलेल्या एका बलकरलाही मोठा फटका बसला असून, एकूण सहा वाहनांचा महामार्गावर अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
कारवर कंटेनर कोसळल्याने गाडीचा पत्र्याचा गोळा झाला होता. या भीषण अपघातात पुण्याचे रहिवासी श्रीकांत अनंत जाधव (वय ६३), अंबादास दामू पेटारे आणि प्रमोद संतोष पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर टाटा टिगोरमधील प्रवासी स्वप्नील भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड आणि स्वतः कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अपघाताचा भीषण आवाज होताच महामार्गावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबीचे पथक, डेल्टा फोर्स आणि हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक युद्धपातळीवर बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कारवर पडलेला तो अवाढव्य कंटेनर बाजूला सारून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या प्रक्रियेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी वेगाने काम करून रस्ता मोकळा केला. दरम्यान, निष्काळजीपणा आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी चालक अवधेश यादव विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरघाटातील तीव्र उतार आणि वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे अपघातांचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.