सातारा : गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयातील डॉ. धैर्यशील घाडगे यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपकरणाची दखल यु. के.(इंग्लंड) या देशाने घेतली. त्यांना जागतिक पेटंट देऊन गौरवले आहे. या उपकरणासाठी डॉ. शैलजा जाधव यांनी त्यांना सहकार्य केले.
मानवी शरीरात निर्माण होणारे विविध आजार व त्यामुळे शरीरावर होणार्या जखमा या दीर्घकाळ बर्या होत नसल्याने रुग्णाला त्रास होत असतो. डॉ. धैर्यशील घाडगे व डॉ. शैलजा जाधव यांनी केलेल्या उपकरणामुळे शरीरावर दीर्घकालीन राहणार्या या जखमा (मधुमेह इत्यादी) लवकरात लवकर पूर्णपणे बर्या होणार आहेत. या संशोधनाबद्दल त्यांचा गौरीशंकर फार्मसी लिंब महाविद्यालयात संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गौरीशंकरच्या संशोधनात्मक क्षेत्राला त्यांनी गती दिली असून डॉ. धैर्यशील घाडगे यांनी संस्थेचा नावलौकिक उंचावला असल्याचे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे. प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांनी ही डॉ धैर्यशील घाडगे यांच्या संशोधनात्मक कार्याची प्रशंसा केली आहे. संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले.
गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब येथे गेल्या 17 वर्षांपासून डॉ. धैर्यशील घाडगे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध सेमिनारमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील विविध शोधनिबंध त्यांचे जागतिक स्तरावर नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. कॅन्सर व क्षयरोग या दुर्धर आजारावर त्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे.