टोमॅटोची डबल सेंच्युरी कायम, पालेभाज्यांचे दर घसरले, बाजारात आल्याची चमक कायम

छत्रपती संभाजीनगरमध्ये टोमॅटोच्या दरातील तेजी कायम

by Team Satara Today | published on : 01 August 2023


छत्रपती संभाजीनगर : टोमॅटोचे भाव अजूनही चढेच असून, सोमवारी (३१ जुलै) १० हजार ते १६ हजार रुपये अशा घाऊक दराने जाधववाडी येथे विक्री झालेल्या टोमॅटोंची अजूनही २०० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. त्याचप्रमाणे आल्याचीदेखील ८० रुपये पावशेरने मागच्या अनेक दिवसांपासून किरकोळ विक्री सुरू आहे. त्याशिवाय बहुतांश फळभाज्यांची २० ते ३० रुपये पावशेरने विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागच्या सलग काही आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरामध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी ३० रुपये, नंतर ४० रुपये आणि आता चक्क ५० रुपये पावशेर, अशा दराने टोमॅटोची किरकोळ विक्री होत आहे. त्यामुळे कधीकाळी २०-३० रुपये किलोने टोमॅटोची खरेदी करणाऱ्यांना आता पावशेर टोमॅटोंवर भागवण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. अगदी एकाच दिवसात क्विंटलमागे काही हजारांनी भाव वाढल्याचेही समोर आले आहे. जाधववाडी येथील बाजारात रविवारी (३० जुलै) ३२ क्विंटल टोमॅटोंची आवक झाली आणि क्विंटलमागे आठ हजार ते १४ हजार रुपये अशी त्यांची घाऊक दराने विक्री झाली. सोमवारी (३१ जुलै) २९ क्विंटल आवक होऊन क्विंटलमागे १० हजार ते १६ हजार रुपये या घाऊक दराने विक्री झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत मागच्या काही दिवसांपासून गावरान टोमॅटो सुमारे ४०-४५ रुपये, तर वैशाली टोमॅटो सुमारे ४५-५० रुपये पावशेर याप्रमाणे त्यांची किरकोळ विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. आल्याच्या दरामध्येही दिलासा नसून, सध्या आल्याची ७० ते ८० रुपये पावशेरने किरकोळ विक्री सुरू आहे आणि हेच भाव मागच्या काही आठवड्यांपासून कायम आहेत.

पालेभाज्या २० रुपयांच्या आत

अजूनही बहुतांश पालेभाज्या १० ते २० रुपये जुडीप्रमाणे शहरात सर्वत्र मिळत आहेत. विशेष म्हणजे पालेभाज्यांचे वैविध्य अजूनही बाजारात पाहायला मिळत आहे. मात्र, बहुतांश फळभाज्या या २० ते ३० रुपये पावशेरने घेण्याची वेळ येत आहे आणि असेच सर्वसाधारण दर मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समृद्धी महामार्गावर पुन्हा मोठा अपघात ; स्लॅब कोसळून १६ जणांचा मृत्यू
पुढील बातमी
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याला कांस्यपदक

संबंधित बातम्या