सातारा : साताऱ्यातील वाई व खंडाळा परिसरात ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात गारांसह गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोमवारी दुपारी चार वाजता आसले (ता वाई) गावाचे हद्दीत पांडवनगर येथे शेतात चंरणाऱ्या मेंढ्या चे कळपावर अचानक वीज पडल्याने सोळा मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ ( पांडवनगर, आसले) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाई येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या व भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी चार वाजता पाऊस सुरू होतानाच अचानक वीज कोसळली व यात आसले येथील मेंढ्याचा कळप सापडला.मेंढपाळ नंदकुमार पिसाळ हे यात सुदैवाने बचावले.पण डोळ्यासमोर १६ मेंढ्या मृत पाहून ते पुरते हतबल झाले.
घटनास्थळी भुईंज पोलिसांच्या टीमने धाव घेत सहाय्यक फौंजदार शिवाजीराव तोडरमल यांनी पोलीस पाटील व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे उपस्थितीत पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पशुवैद्यकीयअधिकारी डॉ. सिसोदिया, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फोउजदार शिवाजीराव तोडरमल,चंद्रकांत भोसले, सुहास कांबळे, होमगार्ड सुशांत धुरगुडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
खंडाळ्यासह पारगाव, अजनूज, कर्नवडी,कण्हेरी, लोहोम, जवळे,शिरवळ,भोळी, शिवाजीनगर,भादवडे, मोर्वे आदी ठिकाणी सोमवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.यावेळी भोळी परिसरात गारांचा पाऊस झाला.तर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ठिकठिकाणी पिकांची काढणी सुरु असून अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथील सोलाडी नावाच्या शिवारात अमोल धायगुडे आपल्या शेळ्या घेऊन गेले होते.सायंकाळी या परिसरात पावसाने सुरुवात केली. यावेळी धायगुडे यांच्या शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली.यात नऊ शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना घडली.शेळ्या दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेमुळे धायगुडे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत असून या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.