सातारा : 1947 साली फाळणी होवून, ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आज असलेला भारतदेश अनेक संस्थानिकांमध्ये विभागला गेला होता. भारतमातेचे सुपूत्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्रयोत्तर भारत एकसंघ करण्यासाठी केलेल्या सर्वंकष प्रयत्नामुळे आज विविधतेमध्ये एकता असलेला एकसंघ भारत देश निर्माण होऊ शकला. त्यांच्या जयंतीदिनी देश एकसंघ राहण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हयात भाजपच्या माध्यमातून आयोजित केलेल्या एकता दौड मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, स्वातंत्रयेात्तर भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले कार्य निश्चितच अजोड अलौकिक आहे. ब्रिटीशांनी देशाची फाळणी करुन स्वातंत्र दिले. फाळणीनंतर व आत्ता असलेल्या भारतात अनेक सरंजामदार, संस्थानिक, निजामशाही अशा सुमारे 350 इतक्या सत्ताराजवटी कार्यरत होत्या. त्या सर्व सत्ताधारी राजवटींशी बोलणी करुन, सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सर्वांचे भारतदेशामध्ये विलिनीकरण केले. जम्मु आणि काश्मिरचा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरुंनी आपल्याकडे निर्णयार्थ ठेवला होता. त्याचेही संपूर्ण विलिनीकरणाचा निर्णयही अखेर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. पोलादी पुरुष म्हणून मान्यता पावलेल्या सरदार पटेल यांच्या करारी व्यकतीमत्वात सामावलेले निस्सिम देशप्रेम, अजोड निर्णयक्षमता, निस्वार्थी वृत्ती आदी कौशल्ये आचरणात आणणे काळाची गरज आहे.
दि.31 आक्टोबर हा दिवस भारताच्या कणखर पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचाही पुण्यस्मरण दिन आहे. देशाच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी आणि देशाचे गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल या दोन महान व्यक्तींच्या चिरंतन समृतींना आम्ही विनम्र अभिवादन करतो, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.