फलटण : फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीनंतर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सभापती पद ओबीसीसाठी राखीव असताना गैर-ओबीसी व्यक्तीची निवड करण्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी स्थानिक राजकीय नेत्यांवर जोरदार टीका करत 24 मार्च रोजी फलटणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
फलटण येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीस मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. बैठकीत सभापती निवड प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे शासकीय विश्रामगृह ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत न्याय मिळावा अशी जोरदार मागणी केली.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडीत ओबीसी समाजातील एकूण नऊ सदस्य निवडून आले आहेत. तरीदेखील मूळ ओबीसी समाजातील सदस्यांना डावलून सभापती पदासाठी गैर-ओबीसी व्यक्तीची निवड करण्यात आली. साखरवाडी गणातून निवडून आलेल्या शिवांजली भोसले या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मूळ ओबीसींना संधी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर
“ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जातो, पण सत्तेत सहभाग देताना त्यांना डावलले जाते. सभापती पद ओबीसीसाठी राखीव असताना देखील ओबीसी उमेदवारांना संधी का दिली नाही?” असा सवाल प्रा. हाके यांनी उपस्थित केला. तसेच, “मूळ ओबीसी समाजाने आता जगायचे की नाही?” असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित करत राजकीय व्यवस्थेवर टीका केली.
24 मार्च रोजी फलटणमध्ये मोर्चा
याप्रकरणी ओबीसी समाजाच्या भावना तहसीलदारांपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून, प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 24 मार्च रोजी फलटणमध्ये मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्याचे किंवा संपविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, फलटणमधील या घटनेचा निषेध म्हणून व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचेही प्रा. हाके यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.