दौलतनगर : कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 अंतर्गत दौलतनगर, ता. पाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या खाद्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खाद्य महोत्सवाला भेट देत विविध खाद्य स्टॉलची पाहणी केली. यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी महोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलवर जाऊन तेथील खाद्यपदार्थांची माहिती घेतली.
स्थानिक तसेच महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची चव चाखत त्यांनी खाद्य संस्कृतीचा आनंद घेतला. प्रत्येक स्टॉलवरील खाद्यपदार्थांविषयी संबंधित विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण चवीची ओळख आणि स्थानिक खाद्य संस्कृती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी हा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य परंपरेची झलक या महोत्सवात पाहायला मिळत असून, नागरिक मोठ्या उत्साहाने या महोत्सवाला भेट देत आहेत.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवातील विविध उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, महोत्सव परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.