फलटण तालुक्यातील कुरवली येथे बकरी चारण्यावरून मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 28 March 2026


सातारा  : फलटण तालुक्यातील कुरवली (बु.) येथे बकरी चारण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मेंढपाळावर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर बबन जेडगे (वय ४२, व्यवसाय मेंढपाळ, रा. कुरवली बु., ता. फलटण) हे दि. २६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या बकऱ्या चारण्यासाठी कुरवली येथील गुळवस्ती परिसरात गेले होते. दुपारी सुमारे १२.३० वाजता बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी गाव हद्दीतील तलावाजवळ गेले असता तेथे संशयित आरोपी सिताराम सतु सुळ व तुकाराम सतु सुळ (दोघे रा. कुरवली, ता. फलटण) हेही आपली जनावरे चारत होते.

यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या बकऱ्या त्यांच्या जनावरांच्या जवळ आल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत दमदाटी केली व “पुन्हा येथे बकऱ्या चारण्यासाठी येऊ नकोस” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी सिताराम सुळ यांनी तेथेच पडलेली लाकडी काठी घेऊन फिर्यादींच्या हातावर मारून जखमी केले. तसेच तुकाराम सुळ यांनीही हाताने मारहाण करत त्यांना खाली पाडले.

या घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या जेडगे यांनी आपल्या मित्र शिवाजी बाळू माने यांना फोन करून माहिती दिली. माने यांनी घटनास्थळी येऊन जेडगे यांना दुचाकीवरून फलटण येथील कोकरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार यादव हे पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात केसरकर पेठेत कर्जाच्या पैशांवरून वाद; घरफोडी व धमकीचा प्रकार; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
आयुष्यात कधीही अंधश्रद्धेला शरण जाणार नाही- शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील संस्कार वर्गात नवपिढीने घेतली अंधश्रद्धेविरुद्ध शपथ.

संबंधित बातम्या