सातारा येथील उमेद मॉलच्या उभारणीसाठी 20 कोटींची तरतूद; ना. जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेच्या मैदानावर विभागस्तरीय सरसचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 07 March 2026


सातारा : राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला कायम स्वरुपी बाजार पेठ मिळावी यासाठी 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. सातारा येथील पोवई नाक्यावरही उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद केली असून या मॉलमध्ये बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री होईल, असे आश्वासन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर विभागस्तरीय सरसचे आयोजन 7 मार्च ते 13 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ग्राम विकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमास अपर आयुक्त प्रांज शिंदे, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्यासह नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिला लखपती झाल्या पाहिजे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, बचत गटातील महिला लखपती झाली पाहिजे यासाठी राज्य शासन अर्थ सहाय्य करीत आहे. महिलांनी उमेदच्या माध्यमातून स्वत:चे व्यवसाय करुन सक्षम झाले पाहिजे. बचत गटांनी बाजार पेठेत कोणत्या मालाला मागणी आहे याचा अभ्यास करुन तो माल उत्पादीत केला पाहिजे. हा माल दर्जेदार असण्याबरोबर पॅकेजींगसह ब्रॅन्डींग केला पाहिजे.

बचत गटांच्या महिलांनी कोणताही व्यवसाय करीत असताना लाजू नये, आपला व्यवसाय शक्तीने, समर्थपणे चालवावा. सातारा जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला कायम स्वरुपी बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सातारा येथील पोवई नाक्यावरील उमेद मॉलचे काम दोन महिन्यात सुरु करावे. हे काम गतीने करुन राज्यातील पाहिला मॉल सातारा येथे उभा राहील यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, बचत गटातील महिलांना सक्षमीकरण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून सातारा येथे विभागस्तरीय सरसचे 7 ते 13 मार्च कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सरसमध्ये विविध जिल्ह्यांचे स्टॉल असून सातारा जिल्हावासियांनी विविध स्टॉलला भेट देऊन वस्तुंची खरेदी करावी, असे आवानही त्यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी दोन कोटींची तरतूद ; ना. जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात
पुढील बातमी
लोकांच्या समस्या जागेवर सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध - जिल्हाधिकारी संतोष पाटील; तळमावले येथे 'महाराजस्व अभियान' समाधान शिबिर उत्साहात

संबंधित बातम्या