सातारा : मराठवाड्यातील महापुरामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, अनेक गावातील लोक आज गंभीर संकटात सापडले आहेत. शेतजमिनी वाहून गेल्या, घरे कोसळली, पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आणि अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. या कठीण परिस्थितीत, ईश्वराच्या कृपेने पश्चिम महाराष्ट्र या आपत्तीपासून दूर राहिला आहे. त्यामुळे संकटग्रस्त बांधवांच्या मदतीला धावून जाणे ही आपली मानवी जबाबदारी असल्याची भावना साताराच्या जमियत उलमा ए हिंद व खिदमत-ए-खलक संस्था यांनी व्यक्त केली.
आज सातारातून भूम-परण्डा परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्याची गाडी रवाना करण्यात आली. यात अन्नधान्य - तांदूळ, गहू, डाळी, पीठ, तेल, साखर, भाजीपाला-कांदे बटाटे ,कोबी , कारले, टोमटो, तयार फूड, बिस्कीट, फरसाण, बटर,टोस्ट ,फूड पॅकेट्स महिलांचे कपडे, मुलांचे कपडे पुरुषांचे कपडे ,ब्लँकेट्स, चादरी ,टॉवेल औषधे सॅनेटरी पॅड ,ड्रायपर आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांचा समावेश आहे तसेच विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या साठी पेन ,वह्या आणि पुस्तकांचे संच सुद्धा तयार करून देत शिक्षणाचे महत्व आज अधोरेखित केले आहे. संकटाच्या काळात भुकेल्या पोटाला अन्न, अंगावर ओढण्यासाठी कपडे आणि आजारपणात औषध मिळावे यासाठी ही मदत विशेषतःपाठविण्यात आली आहे. शैक्षणिक किट बनविल्याने जमियत उलेमा ए हिंद आणि खिदमत ए खलक ने सर्व समाजासमोर कुटुंब उध्वस्त झालेल्यांच्या गरजांमध्ये सुद्धा शिक्षण महत्वाचे आहे हा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
आधार देणे हीच खरी पैगंबरांची शिकवण
याप्रसंगी सादिकभाई शेख म्हणाले, “सर्वांचे पैगंबर मुहम्मद यांनी माणुसकीचा संदेश दिला आहे. धर्म, जात-पात न पाहता संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हेच खरे इस्लामचे तत्त्व आहे. आज मराठवाड्यातील आपले देशबांधव संकटात आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे, त्यांना आधार देणे हीच खरी पैगंबरांची शिकवण आहे.
सर्वधर्मातील सातारकरांकडून वस्तुरूपी मदत
सातारकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली ही मदत भूम-परण्डा येथील पूरग्रस्तांना थोडासा दिलासा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. तसेच पुढील काही दिवसांत आणखी टप्प्याटप्प्याने मदत पाठविण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.आज लहान बाळांनी देखील स्वतःच्या बचतीचे पैसे ,नवीन कपडे स्त्रियांनी घेतलेले नवीन पोशाख देखील मदतीसाठी पाठविले. स्त्रियांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा होता .व्यापारी मंडळ, व्यापारी, काही अधिकारी सर्वधर्मातील बांधवांनी जमियत आणि खिदमत ए खलकच्या आवाहनाला साथ देत वस्तुरूपी मदत केली.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विशेष स्कॉलरशिप जाहीर
पूरपरिस्थिती पाहणी करून आणखीन भरीव मदतीची गरज समजून घेण्यासाठी मदतीसह प्रतिनिधी मंडळ रवाना झाले असून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जमियत उलेमा ए हिंद सातारा ह्यांच्या वतीने विशेष स्कॉलरशिप जाहीर केली असल्याची माहिती जमियत उलेमा चे सातारा जिल्हा सचिव मुफ्ती मोहसीन बागवान यांनी दिली.
जमियत उलेमाचे अध्यक्ष मौलाना रियाज व खिदमत ए खलकचे सादिकभाई शेख आणि हाजी मोहसीन बागवान यांच्या मार्गदर्शनामुसार मुफ्ती उबेदुल्लाह आत्तार, मुफ्ती मोहसीन बागवान, अझहर मणेर, हाजी शाकीर बागवान, हाजी सलीम भारत, रझिया अप्पा शेख,जबीन अप्पा मुलाणी, असिफ खान ,हाजी नदाफ, शाहरुक्ज शेख, असिफ खान, मोहसीन कोरबू,अझहर शेख, सिद्दीक खान, मौलाना अलीम सय्यद, एजाज काझी, हाफिज मुराद, अरिफ खान, पिंटूशेठ सुतार,साजिद शेख, असिफ फरास, इस्माईल पठाण, सादिक बेपारी तसेच जमियत उलेमा ए हिंद, खिदमत ए खलक, मुस्लिम मावळा सैफुल्लाह ग्रुप, व्यापार मंडळा मधील तरुण, महिलांनी सहभाग घेतला.