देयकाच्या तत्पर भरण्यातून (प्रॉम्ट पेमेंट) पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ लाख ५२ हजार ३०० वीजग्राहक दरमहा ३ कोटी ६ लाख ७४ हजार रुपयांची बचत करीत आहेत. तर सातारा जिल्ह्यात २ लाख ३० हजार वीजग्राहकांकडून दरमहा २५ लाख २९ हजार ९०० रुपये, सोलापूर जिल्ह्यात १ लाख ६१ हजार ३९८ ग्राहकांकडून दरमहा २७ लाख ४९ हजार ७८० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ९१० ग्राहकांकडून दरमहा ७८ लाख १९ हजार ३६० रुपये आणि सांगली जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५६० ग्राहकांकडून दरमहा २४ लाख ४७ हजार ८७० रुपयांची बचत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जे वीजग्राहक प्रामुख्याने रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरतात ते प्रॉम्ट पेमेंटच्या सवलतीचा अधिक संख्येने लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.
वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यास त्यांना विनाशुल्क प्रत्येक महिन्याच्या वीजबिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे दिली जात आहे. यामध्ये इतर तपशिलासह वीजबिल भरण्याची तारीख देखील नमूद करण्यात येत आहे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ई-मेलची नोंदणी केल्यास दरमहा वीजबिल संबंधित इमेलवर विनाशुल्क पाठविण्यात येत आहे.
प्रत्येक महिन्यात तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) तारखेच्या मुदतीत वीजबिल भरल्यास वीजग्राहकांना आर्थिक बचतीची संधी आहे. तसेच ‘गो-ग्रीन’, ऑनलाइन वीजबिल भरणा यासाठीही वीजबिलात सूट देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.