पुणे : माजी क्रीडा मंत्री आणि कराड उत्तरचे माजी आमदार श्यामराव आष्टेकर (वय ९१) यांचे आज दि. ८ रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
आष्टेकर हे अत्यंत संवेदनशील, प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ओळखले जात. त्यांनी १९८५ आणि १९९० या दोन कार्यकाळात कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निष्ठावान सहकारी होते.
राजकारणाबरोबरच क्रीडा मंत्री या नात्याने त्यांनी क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान दिले आहे. पुण्यातील बालेवाडी क्रीडानगरीच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या.
त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठधाम येथे संध्याकाळी ६.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.