सातारा : देशाच्या सेवेसाठी सीमेवर तैनात असलेला जवान प्रमोद जाधव (रा. दरे, पो. आरे, ता. सातारा) पत्नीच्या बाळंतपणासाठी आनंदात गावी परतला, पण नियतीला हे सुख मान्य नव्हते. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा साताऱ्यात अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, वडिलांचे निधन झाल्याच्या काही तासातच या जवानाच्या घरी 'कन्यारत्न' अवतरले. मात्र, आपल्या लेकीचे गोंडस रूप डोळ्यात साठवण्यापूर्वीच काळाने या जवानावर घाला घातल्याने संपूर्ण सातारा तालुक्यात हळहळ व्यक्त होतआहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील परळी विभागातील दरे गावचे सुपुत्र प्रमोद जाधव हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. पत्नीची डिलिव्हरी असल्याने ते आठ दिवसांपूर्वीच सुट्टी काढून आपल्या गावी आले होते. घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार म्हणून जाधव कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
मात्र, काळाच्या मनात काही वेगळेच होते. प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षेकरी गृहाजवळ भीषण अपघात झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रमोद जाधव यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नीची प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. ज्या लेकीच्या स्वागतासाठी ते आतुरतेने सुट्टीवर आले होते, तिचे तोंड पाहण्यापूर्वीच प्रमोद जाधव यांनी जगाचा निरोप घेतल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रमोद जाधव यांच्या पश्चात पत्नी, वडील आणि नवजात कन्या असा परिवार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे दरे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिक्षेकरीगृहाजवळ टेम्पोला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक
वाढे फाटा येथून दुचाकीवरून प्रमोद परशराम जाधव हे साताराकडे निघाले होते. भिक्षेकरीगृहाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. धडकेनंतर ते फेकले जाऊन पाठीमागील दुचाकीवर आदळले. अपघातात डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील दोघे युवकही जखमी झाले. घटनेनंतर गर्दी झाली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मृत प्रमोद जाधव हे सैन्यात असून, लडाख येथे सेवा बजावत होते.