शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात आज (शुक्रवारी) दुपारी अपघाताचा मोठा थरार पाहायला मिळाला. लोखंडी साहित्य वाहून नेणाऱ्या एका ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक अनियंत्रित झाला आणि त्याने समोर जाणाऱ्या तीन कारना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह चार जण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांचा मात्र चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारा एक ट्रक (MP 09 HH 8527) खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडून पुढे आला. बोगद्यानंतरच्या तीव्र आणि धोकादायक अशा 'एस' (S) वळणावर ट्रकचे ब्रेक निकामी झाले. उतारावर असल्याने ट्रकचा वेग प्रचंड होता. या अनियंत्रित ट्रकने समोरच्या तीन गाड्यांना एकापाठोपाठ धडका दिल्या. अखेर हा ट्रक एका हॉटेलसमोर जाऊन उलटला.
क्लिनरने उडी मारल्याने वाचला जीव
ट्रक पलटी होत असल्याचे लक्षात येताच क्लिनरने प्रसंगावधान राखत चालत्या गाडीतून बाहेर उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव बालंबाल वाचला. या अपघातात ट्रक चालक अंबादास बापूजी मालवी (वय ३८, रा. उज्जैन, मध्य प्रदेश) यांच्यासह कारमधील सचिन सुरेश बोधले (वय ५०, रा. गोडोली, सातारा), मंगेश बाळू चौगुले (वय ३३, रा. विटा, सांगली) आणि झुंबरबाई बाळू चौगुले (वय ५०, रा. विटा, सांगली) हे जखमी झाले आहेत.
अपघातात MH 11 BV 9268, MH 10 EK 7515 आणि MH 10 DG 7862 या तीन कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शाम गोरड आणि खंडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने मदतीला धावून आले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार अशोक जाधव पुढील तपास करत आहेत.