वाई : 21 व्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे नव्या पिढीची वाचनाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी वाचन संस्कृतीचा ठेवा जपण्याची गरज आहे. वाईचे वैभव असलेले विश्वकोश कार्यालय अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी शासनस्तरावर पाठपुरावा करून हे कार्यालय शहराबाहेर जाऊ दिले नाही. या कार्यालयासाठी नवीन जागेत सुसज्ज इमारत बांधण्याचा शासन निर्णय झाला असल्याची माहिती ना. मकरंद पाटील यांनी दिली.
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, दत्तात्रय मर्ढेकर, विश्वस्त अनिल जोशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली उपस्थित होते. दरम्यान, ग्रंथ दिंडीचा शुभारंभ एस.डी. इनामदार, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत पूजनाने झाला.
ना. पाटील म्हणाले, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात अनेकांनी शहराचा नावलौकिक वाढवला आहे. प्राज्ञ पाठशाळा मंडळ, विश्वकोश कार्यालय, ब्राह्मोसमाज, लो.टिळक ग्रंथालय ही वाईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची शक्तीपीठे आहेत. मराठी विश्वकोशाची निर्मिती आणि यशवंतराव चव्हाण आबासाहेब वीर यांना मार्गदर्शन करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आचार-विचारांचे संस्कार या मातीत रुजले आहेत. ग्रंथालय चळवळ गतिमान करून वाचन संस्कृती जपण्याचे काम करताना लो.टिळक स्मारक संस्थेने लोकहितवादी यांचा दृष्टिकोन सार्थ केला आहे. ग्रंथालय कर्मचार्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.