तब्बल २० वर्षानंतर चिंचवडमध्ये शरद पवारांचा रोड शो

नागरिकांची तुफान गर्दी

by Team Satara Today | published on : 15 November 2024


पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी गुरुवारी तब्बल तीन तास ‘रोड शो’ केला. सांगवीतून सुरु होऊन वाल्हेकर वाडी इथे समाप्त झालेल्या या रोड शोला चिंचवड वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तब्बल २० वर्षानंतर आणि चिंचवडच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवारांनी रोड शो केला. त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची राजकीय मुसंडी हा दिवसभर चर्चेचा विषय राहिला. रोड-शोचे चौका-चौकात जल्लोषात स्वागत झाले. यात्रे दरम्यान शरद पवार आणि उमेदवार राहुल कलाटे सर्वांना हात उंचावून अभिवादन करत होते. त्यांना पाहण्यासाठी रोड-शोच्या मार्गावर दोन्ही बाजुंनी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लोकं आपापल्या मोबाईलमधून यात्रेची क्षणचित्रंही टिपत होती. दरम्यान कार्यकर्त्यांच्या “देशाचा बुलंद आवाज….शरद पवार….शरद पवार!! ; आमचा आमदार राहुलदादा.. राहूलदादा” या घोषणांनी अवघी चिंचवडनगरी दुमदुमली होती.

नवी सांगवी येथील साई चौक येथून भव्य रथयात्रेला (रोड शो) सुरुवात झाली. “रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’च्या जय घोषात वाजत-गाजत हजारोच्या संख्येत कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी यामध्ये झाले होते. पुढे सांगवी, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, डांगे चौक, चिंचवडगाव आणि वाल्हेकरवाडी असा या यात्रेचा मार्ग राहिला. रोड शोची सांगता वाल्हेकरवाडी येथे जाहीर सभेत झाली.

यंदा राहुल कलाटे यांना आमदार करायचंच, असा निर्धार व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार दिग्गज नेत्यांनी चिंचवडमध्ये चांगलेच लक्ष घातले आहे. आजच्या यंत्रे दरम्यान उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह कॉंंग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार, इम्रान शेख, ज्योती निंबाळकर, अरुण पवार, उल्हास कोकणे यांच्यासह महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सर्व राजकीय पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्यात कोणाची सत्ता येणार हे चित्र 23 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग
पुढील बातमी
आरोग्यदायी अळू डोळ्यांसाठी खूप फायदेशीर

संबंधित बातम्या