सातारा : सातारा शहरांमध्ये नवरात्र उत्सवाचा भक्तिमय माहोल आणि दांडियांचे सत्र सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी सदरबाजार येथे दोन युवकांच्या गटात जोरदार मारामारी झाल्याचे वृत्त आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या बंगल्यासमोरच ही मारामारी झाल्याने शहर पोलिसांची एकच पळापळ झाली.
ही मारहाण नक्की कशातून झाली हे मात्र समजू शकले नाही. हा प्रकार सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान झाला मारामारी करणारे युवक हे एका महाविद्यालयाचे असून तेथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर तेथून घरी जात असताना अचानकच एका युवकांच्या गटाने सदर बाजार येथील पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोर असणाऱ्या दुसऱ्या युवकाला मारायला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या मारामारी नाट्यामुळे पादचारी सुद्धा अचंबित झाले. बंगल्यावर बंदोबस्ताला असणारे पोलीस कर्मचारी धावत आले असता काही युवकांनी तेथून पलायन केले.
ज्याला माराचा प्रसाद मिळाला त्यानेही तेथून काढता पाय घेतला.समाज माध्यमांवर या घटनेची माहिती प्रसारित होताच सातारा शहर पोलिसांची धावपळ उडाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी कोणीही आढळून आले नाही यामुळे या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये झालेली नाही.