साहित्य संमेलनातील कवि कट्टयासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 13 October 2025


सातारा : साताऱ्यात मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. सार्वजनिक मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष असलेले हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील आहे. या संमेलनातील कवी कट्टा या व्यासपीठावर स्वरचित कविता पाठवण्याचे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कवि कट्टा प्रमुख राजन लाखे, समन्वयक सविता कारंजकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

पत्रकात, साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून नियोजनाचे काम वेगाने सुरु आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी कट्टा या व्यासपीठावर कवींना कविता सादर करण्याची संधी मिळते. या कवी कट्टयासाठी कविता पाठवण्याचे आवाहन कविकट्टा संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी कविता ही स्वरचितच असावी. प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी. कविता ही २० ओळींपेक्षा मोठी नसावी. कवितेसोबत परिचय अथवा फोटो पाठवू नये. कवीने स्वत:चे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आणि व्हॉटसॲप क्रमांक पानाच्या वरच्या बाजूला उजवीकडे स्पष्ट अक्षरात लिहावा. संधी न मिळालेल्या कवींना संधी मिळण्याच्या उद्देशाने मागील २ वर्षांतील म्हणजे ९७ वे अमळनेर व ९८ वे दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या व्यासपीठावर सादरीकरणासाठी निवड झालेल्या कवींनी कृपया कविता पाठवू नये, त्यांचा विचार केला जाणार नाही. कवितेची निवड साहित्य निवड समिती करेल व त्याप्रमाणे निवड झाल्यास कवींना सादरीकरणाचा दिवस आणि वेळ दूरध्वनीने / ई-मेलने कळविण्यात येईल. कविता ई-मेलद्वारे पाठवताना ती युनिकोडमध्ये टाईप केलेली असावी. (गुगल टाईप.) कविता ई-मेल अथवा पोस्ट यापैकी एकावरच पाठवावी. 'व्हॉटसॲपवर'पाठवलेली कविता ग्राह्य धरली जाणार नाही. पोस्टाने पाठविताना पाकिटावर 'कविकट्टा' असा स्पष्ट उल्लेख असावा. कवितेचे सादरीकरण करण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ असेल. सादरीकरणानंतर कवीला सन्मानाने स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.  कविता स्वीकारण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कविता स्वीकारल्या जाणार नाहीत. कविता पाठविण्यासाठी ई-मेल   kavikatta99satara@gmail.com  तर पोस्टाचा पत्ता : जनता सहकारी बँक लि. सातारा, मुख्य कार्यालय, १७९, भवानी पेठ, सातारा. ४१५००२ असा असल्याची माहिती कविकट्टा संयोजन समितीतर्फे देण्यात आली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण येथील यशवंत बँकेत 112 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस
पुढील बातमी
कराड ‘कृष्णा मेडिकल’च्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर

संबंधित बातम्या