सातारा जिल्ह्याच्या 23 मंडलांमध्ये मुसळधार पाऊस

महाबळेश्वर मध्ये तब्बल 103 मिलिमीटर पाऊस; चाळीस घरांची पडझड, 156 पशुधनाचे नुकसान

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. मान्सून सातार्‍यात दाखल होण्याआधीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 23 मंडलांमध्ये 65 मिलिमीटर ची मर्यादा ओलांडली आहे. यामध्ये महाबळेश्वर व पाचगणी येथे 103 मिलिमीटर सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. सातारा, जावली, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर या पाच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पशुधन आणि वित्तहानीचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. 

याबाबतची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानीचे आकडे वाढत आहेत. मौजे पेरले, तालुका कराड येथील संभाजी सूर्यवंशी वय 70 हे दिनांक 22 मे रोजी सायंकाळी सहा वाजता शेतात खत टाकण्यासाठी गेले असता त्यांना तुटलेल्या तारेचा शॉक लागून जागेवर मयत झाले. वडोली भिकेश्वर तालुका कराड येथे अर्धा एकर शेत जमीन अवकाळी पावसाने वाहून जाऊन हळद पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद कराड महसूल विभागाने घेतली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यात 12, पाटण तालुक्यात 3, कोरेगाव तालुक्यात सहा, वाई तालुक्यात 4, खंडाळा तालुक्यात एक, माण तालुक्यात दोन, खटाव तालुक्यात 12 अशी मिळून 40 घरांची पडझड झाली आहे. खटाव तालुक्यातील दीडशे कोंबड्या, तर वाई, माण व फलटण येथील सहा जनावरे यांचा अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये मृत्यू झाला आहे. 

साधारण 65 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस मुसळधार म्हणून गणला जातो. सातारा तालुक्यामध्ये सातारा येथे 76.8 मिमी, वर्ये येथे 93 मिमी, कण्हेर 76.8 मिमी, अंबवडे 89.3 मिमी, दहिवडी येथे 76.8 मिमी, परळी येथे 89.3 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. सर्वाधिक मुसळधार महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर व पाचगणी येथे 103 मिलिमीटर, तापोळा येथे 127 मिलिमीटर, नवजा येथे 78 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे. जावली तालुक्यात 102.8 मिमी, आनेवाडी येथे 109 मिलिमीटर, कुडाळ येथे 98. 5 मिलिमीटर, बामणोली 127.8 मिमी, केळघर येथे 102.8 मिमी, करहर येथे 102.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाई तालुक्यात पसरणी येथे 103.3 मिमी, पाचवड येथे 84 मिमी, धोम येथे 72.3 मिलिमीटर, भुईंज 84 मिमी, ओझर्डे येथे 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे 66.5 मिमी, किन्हई येथे 88.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रात सात जूनला पावसाचे आगमन झाल्यानंतर राज्यात सर्वदूर पोहोचण्यासाठी 15 जून ही तारीख उजाडते. मात्र यंदा अवकाळी पावसाने वेगळाच विक्रम केला आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये अवकाळी पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे आणि शुक्रवारी जिल्ह्यामधील तब्बल 23 मंडलांमध्ये मुसळधार पाऊस नोंदला गेला आहे. यापूर्वी हवामानातील असा बदल कधीही नोंदला गेला नव्हता. अवकाळी पाऊस हा वादळी वार्‍यासह दोन ते तीन तास टिकतो. त्यानंतर त्याला उघडीप मिळते. मात्र यंदाच्या अवकाळी पावसाचा अद्यापही जोर कायम असून अरबी समुद्रातील कमी दाबाचे सातत्याने विकसित होणारे क्षेत्र हे याला कारणीभूत आहे. आगामी 72 तास पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला गेला असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कानिमोझीसह भारतीय खासदारांचे विमान उतरणार तोच मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला
पुढील बातमी
संगम माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ

संबंधित बातम्या