सातारा : देशभरात धर्मांध, जात्यांध, विखारी राजकारणाचे विषारी वातावरण दिवसेंदिवस अधिकच गडद होत असताना दिवाळी सुट्टीच्या पहिल्याच दिवशी सदरबझारमधील नगर पालिकेच्या शाळेत जातीभेदाच्या भिंती तोडून सर्वधर्मीय विद्यार्थांनी शुभेच्छापत्रे तयार करण्याचा आनंद घेतला.
नगरपालिकेच्या १२ नं. शाळेच्या प्रांगणात हिंदू आणि मुसलमान, उर्दू आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी एकत्र आले होते. सुमारे दोन तास दिवाळीची शुभेच्छा पत्रे तयार करण्याचा उपक्रम चालला. ‘हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाई, आपसमें है बहना भाई’, ‘माणसा माणसा जागा हो, संविधानाचा धागा हो’ अशा घोषणा मुलांनी दिल्या. लेकरांनी पुन्हा पुन्हा चकली मागून, लाडू चकली आणि चिवड्याचा आस्वाद घेतला आणि खऱ्या अर्थाने आमची दिवाळी सुरू झाली, दिवाळी साजरी होऊ लागली.
दरवर्षीप्रमाणेच या शाळेत साजरा झालेला हा दिवाळी सण मिनाज सय्यद, रजनी पवार, ॲड. वर्षा देशपांडे, ॲड. शैला जाधव, सिंधू कांबळे, स्वाती बल्लाळ, उमा कांबळे, संघमित्रा वाटम्बले, सादिक बागवान आणि प्रा. संजीव बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला.
मुख्याध्यापिका रेश्मा शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. तक्षशिला विद्यामंदिरच्या कारंडे सरांनी आभार मानले.