महाराष्ट्रदिनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची घोषणा

by Team Satara Today | published on : 01 May 2025


महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ असं या चित्रपटाचं नाव आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असं सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला.

“हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा… गाठ माझ्याशी आहे,” या शिवगर्जनेच्या सोबतीने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाचा उद्देश स्पष्ट होतो. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून हा चित्रपट ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे.

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. सिद्धार्थने अलीकडील काळात मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली असून आता शिवरायांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्याला मिळाली आहे. चित्रपटात त्याच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं लेखन अंतिम टप्प्यात असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल. महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचं संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध करत आहेत.

चित्रपटाच्या आशयात नेमके कोणते सामाजिक किंवा राजकीय विषय हाताळले जाणार, हे सध्या गुप्त ठेवण्यात आलं आहे. मात्र, महाराष्ट्रच या चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू असणार आहे. आजच्या महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवर चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, जे प्रश्न गेल्या काही दशकांपासूनही अनुत्तरितच आहेत. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “माझ्यातला कलाकार गप्प बसत नाही. मी कलाकृतीतून व्यक्त होतोय. हा नवा कोरा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता, सामाजिक भान जागवणारा असणार आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ऐतिहासिक किंवा काल्पनिक मांडणीपेक्षा आधुनिक वास्तवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. आजच्या काळात ज्या प्रश्नांनी समाजाला जखडून ठेवलं आहे, त्या असंतोष, उदासीनता, सामाजिक भानाचा अभाव यावर शिवाजी महाराजांचे कालातीत विचारधन प्रकाश टाकणार आहे.’’

सिद्धार्थ बोडके आपल्या भूमिकेविषयी म्हणाला, “ही केवळ भूमिका नाही, ही एक जबाबदारी आहे. याआधी अनेकांनी महाराजांची भूमिका साकारली असून, आता ती जबाबदारी माझ्यावर आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती 'ही' ठिकाणे
पुढील बातमी
बीड दौऱ्यावर जरांगे पाटलांना भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल

संबंधित बातम्या