मुंबई : नुकतीच मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे बॉलिवूडमध्येछत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत भव्यदिव्य सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. फेब्रुवारीमध्ये संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत विकी कौशलचा 'छावा' सिनेमा येणार आहे आपल्या सर्वांना माहितच आहे. आता नुकतीच छत्रपती शिवरायांवर आधारीत मेगा बजेट सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. विशेष म्हणजे साउथ सुपरस्टार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी या सिनेमात शिवरायांची भूमिका साकारणार आहे.
नुकतीच संदीप सिंग यांनी या सिनेमाची घोषणा करण्यात आली. 'द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज'असं या सिनेमाचं पूर्ण नाव आहे. पोस्टरमध्ये भगव्या रंगात हिंदवी स्वराज्य अशी अक्षरं दिसत असून शिवरायांची राजमुद्रा दिसत आहे. संदीप सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संदीप यांनी याआधी बॉलिवूडमध्ये 'मेरी कोम', 'सरबजीत' अशा आशयघन सिनेमांची निर्मिती केलीय. पोस्टरमध्ये शिवरायांच्या भूमिकेत ऋषभ शेट्टीची झलक दिसतेय.
'छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यात 'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टी सिनेमात शिवरायांची भूमिका साकारणार आहे असं समजताच सर्वांना आनंद झालाय. हा सिनेमा पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना खूप वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण २१ जानेवारी २०२७ ला सिनेमा रिलीज होणार आहे. म्हणजेच तब्बल ३ वर्षांनी हा मेगाबजेट ऐतिहासीक सिनेमा रिलीज होणार आहे.