पणजी : जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला पसंती देतात, मात्र गोव्यातील पर्यटनाला गालबोट लावणारी अत्यंत धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली आहे. गोव्यातील अर्पोरा (Arpora) येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २३ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामध्ये ३ महिला आणि २० पुरुषांचा समावेश असून, मृतांमध्ये क्लबचे कर्मचारी आणि काही पर्यटकांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अर्पोरा येथील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये ही आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, सिलिंडरचा स्फोट झाल्याने हे अग्नितांडव घडले असावे. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीपेक्षाही धुरामुळे गुदमरून (Suffocation) अनेकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री १२:०४ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रात्रभर बचावकार्य सुरू होते, मात्र तोपर्यंत २३ जणांचा जीव गेला होता. सर्व मृतदेह बांबोलीम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप आमदार मायकल लोबो यांनी दिली.
ही दुर्घटना घडली त्या क्लबमध्ये अग्निसुरक्षेच्या (Fire Safety) कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा क्लब व्यवस्थापनावर आणि त्यांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. "हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, त्यांना तात्काळ अटक केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गोवा डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, पोलीस सध्या आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. फॉरेन्सिक तपासांतीच आगीचे खरे कारण स्पष्ट होईल. मात्र, या घटनेमुळे गोव्यातील हॉटेल्स आणि क्लबच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.