कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान - डॉ. तारा भवाळकर ; साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा

by Team Satara Today | published on : 01 January 2026


स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी : सदैव कृतिशील माणसे स्वतः आनंदी राहतातच, पण आपल्या कृतीशीलतेने भोवतालही आनंदित करतात. सातारकर साहित्यिकांनी अशी कृतीशीलता सिद्ध केली आहे, असे गौरवोद्गार संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी काढले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी (दि. १) ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान डॉ. भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. त्यामध्ये बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन जाधव पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रदीप विधाते, प्रभाकर घारगे, कांचन साळुंके आदींचा समावेश होता.

डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते जयवंत गुजर, न. म. जोशी, सतीश कुलकर्णी, नलिनी महाडिक, म. वि. कोल्हटकर, संभाजीराव पाटणे, रवींद्र बेडकीहाळ, वि. ना. लांडगे, रमणलाल शहा, पुरुषोत्तम सेठ, शैलजा दाते, ॲड. डी. व्ही. देशपांडे, दिलीप पटवर्धन आणि श्याम भुर्के या साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या, जीवनाची इतिकर्तव्यता निष्ठेने पार पाडून, साहित्यसेवा करणारी ही मंडळी आहेत. त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले, याचा आनंद वाटतो. मला ही संधी दिल्याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे. संस्कृती प्रकाशनाच्या संभाजीराव पाटणे संपादित जनसंवाद राजमातांचा (राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक भाषणांचा संग्रह) या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर; ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ; ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी
पुढील बातमी
साताऱ्यात उद्या भाजप नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा ; मुख्यमंत्री फडणवीस, ना. शिवेंद्रसिंहराजे, ना. गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

संबंधित बातम्या