सातारा : वाई-महाबळेश्वर रस्त्यावर वाई बसस्थानकाच्या समोर भरधाव मोटारीने पदचार्यांना ठोकर मारल्याने एका पदाचार्याचा जागीच मृत्यू झाला. साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले. वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भर गर्दीच्या रस्त्यात भरधाव वाहन घुसल्याने हा अपघात झाला, अशी माहिती परिक्षाविधीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाई बस स्थानकाच्या समोर महाबळेश्वर येथून वाई शहराकडे येणार्या रस्त्यावर भरधाव वाहनाने गाडी क्रमांक (एमएच 04 जीई 6695) रस्त्याच्या कडेने चालणार्या पादचार्यांना जोरदार धडक मारली. गाडी त्याच वेगात पुढे जात राहिल्याने गाडीच्या धक्क्याने एका पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते (सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वारोशी, ता महाबळेश्वर) सिताराम धायगुडे (वाई) आणि शिवांश जालिंदर शिंगटे (राऊतवाडी ता कोरेगाव. हा साडेतीन वर्षांचा मुलगा) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना वाई व सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व पदचारी वाई बाजारपेठेतील आपापली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचार च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापार्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले,कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती परिक्षाविधीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. या अपघाताचा उपनिरीक्षक बिपिन चव्हाण अधिक तपास करीत आहेत.