कराड : कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजूर झालेल्या सुमारे साडेचार लाख रुपये बिलापैकी 42 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. ओगलेवाडी (ता. कराड) येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
टेंभू उपसा सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता आनंद रामदास काळमेघ (वय 51, रा. सिल्वर ओक बिल्डिंग, सैदापूर- कराड, मूळ रा. मार्केट यार्ड, पुणे) व कनिष्ठ अभियंता माधुरी साई देवरे (वय 35, रा. सिल्वर गार्डन अपार्टमेंट, बनवडी फाटा, कराड) या दोघांवर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिक विद्युत पथक योजनेला सिक्युरिटी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम तक्रारदार करतात. त्याअंतर्गत त्यांनी प्रतिदिन 610 रुपयेप्रमाणे तीन सुरक्षारक्षक पुरवले होते.
या सुरक्षारक्षकांचे एकूण 5 लाख 94 हजार 720 रुपये बिल कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयाला टेंभू कार्यालयाकडून पाठविण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी या बिलापैकी 4 लाख 66 हजार 960 रुपये तक्रारदाराच्या खात्यावर जमा झाले. मात्र, हे बिल मंजुरीला पाठवल्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्केप्रमाणे कनिष्ठ अभियंता माधुरी देवरे यांनी लाच मागितली. दि. 19 नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष माधुरी देवरे यांनी 17 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच कार्यकारी अभियंत्यांनाही भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे दि. 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी कारवाईवेळी कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ यांनी तक्रारदाराकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार आज दि. 28 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी आनंद काळमेघ 25 हजार रुपये तर माधुरी देवरे 17 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात आढळल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.