सातारा : सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलत दोन सराईत गुन्हेगारांना थेट जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे. सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या या दोघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असून, शिरवळ पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ, खंडाळा आणि भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असलेल्या अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे (वय ३३, रा. बौद्धवस्ती, शिरवळ) आणि इम्रान कलाम काझी (वय ३८, रा. शिरवळ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत आदेश जारी करत या दोघांना सहा महिन्यांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे निर्देश दिले होते.
या आदेशानुसार, शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद आणि पोलीस शिपाई अक्षय बगाड यांनी ही कारवाई प्रत्यक्षात आणली. संबंधित दोन्ही गुन्हेगारांना सातारा आणि पुणे जिल्ह्याबाहेर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेऊन सोडण्यात आले आहे. ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे (फलटण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.