पुसेगाव : खटाव तालुक्यातील पांगरखेल येथील ग्रामस्थानी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत अग्रेसर राहण्याचा निर्धार केला आहे. गुरुवारी ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.
याबाबत नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये दर आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी सार्वजनिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रमदानात पाणंद रस्ते तसेच इतर छोटीमोठी कामे करणे. लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी डिजिटल करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे सर्वानुमते ठरले. तर पहिल्याच बैठकीत महेंद्र जगताप यांनी पाच हजार रुपये रोख देणगी तसेच अजित जगताप यांनी जिल्हा परिषद शाळेसाठी संगणक व ज्ञानेश्वर जगताप यांनी लॅपटॉप देण्याचे जाहीर केले.
बैठकीनंतर पहिल्या गुरुवारी ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सरपंच अलका जगताप, उपसरपंच महेंद्र जगताप, माजी सरपंच ज्ञानेश्वर जगताप, ग्रामसेवक संजय काळेल आदीसह मान्यवर ग्रामस्थ होते.