सातारा : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच, सदस्यांनीच ग्रामपंचायतीचे कामकाज केले पाहिजे. प्रत्येक महिन्याला होणार्या ग्रामपंचायतीच्या सभेत कामकाजातील सर्व निर्णय घेतले जातात. आर्थिक व्यवहाराच्या सर्व मंजूरी सुध्दा याच सभेत होत असल्याने सदस्यांचा अभ्यासपुर्ण सहभाग आवश्यक आहे. यापुढे ग्रामपंचायतीचे कामकाज असून ऑनलाईन व्यवहार आणि संगणकावर रेकॉर्डच्या नोंदी होत असल्याने सरपंच आणि सदस्य हे संगणक ज्ञान असणारे, कामकाजाची जबाबदारी घेऊन वेळ देणारे असावेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजात महत्वाची भुमिका ही ग्रामपंचायत अधिकार्यांची नाही तर सरपंच, सदस्यांची असल्याने तेच सक्षम हवेत, असे प्रतिपादन प्राचार्य विजय जाधव यांनी केले.
सातारा तालुका पत्रकार संघ आणि सातारा शहर पत्रकार संघांच्या सदस्यांसाठी ओळख ग्रामपंचायतीच्या कामकाजाची यावर गुरूवार दि. 10 जुलै एक दिवसीय कार्यशाळा वर्ये (सातारा) येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाली. पत्रकारांना ग्रामपंचायत कामकाज आणि अधिनियमाची योग्य माहिती असावी, यासाठी दोन्ही पत्रकार संघाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
मार्गदर्शन करताना प्राचार्य विजय जाधव यांनी ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच हे कार्यकारी प्रमुख, प्रशासकिय प्रमुख, कोष्याध्यक्ष आहेत. सरपंच सदस्यांना कायदेशीर ज्ञान असेल तर कामकाज करता येते. त्यांनी जबाबदारी घेवून काम केले तर त्यांचे महत्व वाढेल. त्यांना अधिनियमानुसार कामकाजाची जबाबदारी, कर्तव्य, कामे, अधिकार दिले असून त्यात कसूर केल्यास अपात्रतेची कारवाई अथवा ग्रामपंचायत कार्यकारणी बरखास्त केली जाते. प्रत्यक्षात कायदयाचे परिपुर्ण ज्ञान नसल्याने नियमित कामकाजात सरपंच आणि सदस्यांचा अपेक्षित सहभाग नाही. वॉर्डसभा, समित्यांच्या बैठका, महिला सभा होत नाहीत. सदस्यांच्यावर कामकाजातील जबाबदार्या दिल्या जात नसल्याने ते फक्त सही करीता ग्रामपंचायतीत येतात. ग्रामपंचायतीच्या कामकाजात राजकारण केल्यास गावाचेच नुकसान होते. लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी केली तर गावाचा लौकिक वाढेल, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान हेंद्रे यांनी, लोकशाहीचा स्तंभ असणार्या पत्रकारांनी ग्रामपंचायतीचे कामकाज कायदेशीर चौकटीत होण्यासाठी सकारात्मक योगदान दयावे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सरपंच, सदस्यांनी कायदेशीर सोपविलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक सक्षमपणे होण्यासाठी सरपंच, सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
सातारा तालुका पत्रकार संघाचें अध्यक्ष अजय कदम यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पत्रकार संतोष यादव आणि मिलींद लोहार यांनी जर्नालिझम पदवी उत्तीर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तालुका आणि शहर पत्रकार संघाचे सदस्य मोठया संख्येने कार्यशाळेस उपस्थित होते.