पहलगाम : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी जम्मू – कश्मीर पोलीस कसून चौकशी करत आहे. गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या मोहम्मद यूसुफ कटारी याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. 22 एप्रिल रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कटारी जवळपास 4 वेळा भेटला होता. एवढंच नाही तर, त्याने दहशतवाद्यांना मोबाईल चार्जर देखील दिलेला. याच चार्जरमुळे कटारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममध्ये 26 जणांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या सुलेमान उर्फ आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगानी यांना महत्त्वपूर्ण रसद पुरवल्याच्या आरोपाखाली सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कटारीला अटक करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारी हा फक्त 26 वर्षांचा आहे. चौकशी दरम्यान कटारी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो श्रीनगर भागात तीन लोकांना चार वेळा भेटला होता. ऑपरेशन महादेवच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या साहित्यांचं सखोल फॉरेन्सिक विश्लेषण आणि तपासानंतर त्याला अटक करण्यात आली.
ऑपरेशन महादेव जुलै महिन्यात सुरु करण्यात आलं होतं. या ऑपरेशन दरम्यान, पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेले तीन दहशतवादी मारले गेले. या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या अनेक वस्तूंमध्ये अँड्रॉइड मोबाईल फोनचा अंशतः खराब झालेला चार्जर आढळल्यानंतर पोलिसांनी कटारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चार्जरच्या आधारावर पोलिसांनी चार्जरच्या मालकाचा शोध घेतला आणि त्याने एका डीलरला फोन विकल्याची माहिती दिली. याच माहितीच्या आधारावर पोलीस कटारी याच्यापर्यंत पोहोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारी हा विद्यार्थ्यांना शिकवत होता आणि दहशतवादी गटासाठी तो एक प्रमुख स्रोत होता. त्याने हल्लेखोरांना चार्जर पुरवून आणि कठीण मार्गावरून मार्गदर्शन करून मदत केल्याची माहिती समोर येत आहे.
पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सुलेमान उर्फ आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांचा 29 जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे, ज्यांच्यावर दहशतवाद्यांना रसद पुरवणे आणि आश्रय देण्याचा आरोप आहे.