सातारा : राज्यात काही भागांत कृत्रिमरीत्या खत टंचाई निर्माण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने ३१० खत विक्रेत्यांची तपासणी केली. या वेळी पॉस मशिनचा वापर न करता खतांची प्रत्यक्ष विक्री केल्याचे दिसून आल्यामुळे प्रत्यक्ष व पॉस मशिनवरील खत साठ्यात तफावत आढळून आली.
आतापर्यंत कृषी विभागाने ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून, उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.
जिल्ह्यात कृषी विभागाने खत विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. खताची विक्री करताना प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळून आल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३१० खत विक्रेत्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, काही ठिकाणी पॉस मशिनचा वापर न करता खतांची प्रत्यक्ष विक्री केल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रत्यक्ष व पॉस मशिनवरील खतसाठ्यात तफावत आढळून आली. याबाबत संबंधित विक्रेत्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. सन २०१७ पासून अनुदानित खताची विक्री ही पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना खत विक्री करताना आधार लिंक करणे बंधनकारक असून, याशिवाय खत विक्री करता येणार नाही. मात्र, काही ठिकाणी त्याचे उल्लंघन होत असल्यामुळे कृषी विभागाने आतापर्यंत नऊ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. यापुढेही याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ननावरे यांनी दिली.
जिल्ह्यातील ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
कृषी विभागाची कारवाई; पथकाच्या तपासणीत साठ्यामध्ये तफावत
by Team Satara Today | published on : 10 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा