मंत्री जयकुमार गोरेंना अडकवण्यामागे शरद पवारांच्या नेत्यांचा हात

कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात दावा

by Team Satara Today | published on : 26 March 2025


मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर सातार्‍यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणार्‍या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं, अशा हेतूने राजकारण करणे योग्य नाही. ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली असून 2019 मध्ये संपली. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. पण काही गोष्टी उकरुन काढल्या आहेत. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली. त्यानंतर सापळा रचला. पैसे देताना आरोपीला पकडलं. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता, अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू, हे बरोबर नाही. शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणात चार तक्रारी झाल्या आहेत. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. एक ती महिला आहे. दुसरा यू-ट्यूबर तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे. त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत. कट रचला हे लक्षात आले आहे. पण दुर्दैवाची गोष्टी पुढची आहे की, या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसून आलेत. मी हे पुराव्यानिशी सांगत आहे. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांच्याशी आहेत. गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत, ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होणार आहे. हे काय चाललं आहे? आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत. अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे, अशी खंतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी 16 जणांवर गुन्हा
पुढील बातमी
बापानेच पोटच्या लेकाला टॉनिकच्या बाटलीतून पाजले विष

संबंधित बातम्या