सातारा बसस्थानक हाऊसफुल्ल; चाकरमानी परतीच्या प्रवासाला, महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडीने प्रवाशांमधून संताप

by Team Satara Today | published on : 27 October 2025


सातारा :  दिवाळी सणानिमित्त चाकरमनी गावाकडे आले होते. सोमवारपासून शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू होत असल्याने चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे सातारा बसस्थानक रविवारी सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. दरम्यान महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे एसटी बसेसचे वेळापत्रकही कोलमडत होते. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता.

स्वारगेट, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. जादा बसेस सोडल्या तरी प्रवाशांच्या रांगा हटत नव्हत्या. स्वारगेटसाठी दर 10 मिनिटाला सातारा आगारातून बस सोडण्यात येत होती. लांब पल्यासह अन्य ठिकाणी धावणाऱ्या बसेस हाऊसफूल्ल होत्या. प्रवाशी उभे राहून प्रवास करताना दिसत होते. दिवाळी सणाच्या सुट्टीसाठी गावी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला.सातारा बसस्थानकात तर प्रवाशांना एसटी बसेसची वाट पहात बसावे लागत होते. मात्र आलेली एसटी पुन्हा प्रवाशांनी भरल्यानंतर विविध मार्गावर पाठवण्यात येत होती. मात्र फलटण येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी सातारा विभागातून सुमारे 350 हून अधिक बसेस संबंधित पक्षाने आरक्षीत केल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमासाठी बसेस गेल्याने प्रवाशांच्या खोळंबा झाला होता. मात्र सायंकाळनंतर पूर्ववत एसटीची सेवा सुरळीत सुरू झाली.

 खंबाटकी बोगदा ते पारगावपर्यंत संथगतीने वाहतूक

खांबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळील रस्ता अरुंद असल्यामुळे खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी 1 नंतर महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होवू लागली. यावेळी चारचाकी वाहने, मोठी व अवजड वाहने गरम होऊन रस्त्यातच बंद पडल्याने वाहतूककोंडीत भर पडत होती. तसेच बेशिस्त वाहनांमुळे अवजड वाहनधारकांसाठी अडचणी येत होत्या. खंडाळा पोलीस व महामार्ग पोलीस यांनी आज दिवसभर खांबाटकी घाट व बोगदा परिसरात बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात झाली नाही. त्यातच पावसाची रिप रिप, रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आर्याच्या कुटुंबीयांची खा. उदयनराजे यांनी घेतली भेट; न्याय मिळेपर्यंत पाठीशी उभे राहण्याचे दिले आश्वासन
पुढील बातमी
न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल टीकाटिप्पणी करण्याचा प्रश्नच येत नाही; मंत्री पंकजा मुंडे यांचा जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव

संबंधित बातम्या