पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून

पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने केले कृत्य

by Team Satara Today | published on : 02 January 2025


कराड : पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. विंग, ता. कराड येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही घटना घडली.

मयुरी मयुर कणसे (वय 27) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती मयुर यशवंत कणसे (वय 30) यास पोलिसांनी खूनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. मयुरचा चुलत भाऊ विशाल सदाशिव कणसे याने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागात तिचा गळा दाबल्याची कबुली पती मयुरने पोलिसांजवळ दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विंग ता. कराड येथील मयुर कणसे याचे मयुरी यांच्याशी 2018 मध्ये लग्न झाले. त्यानंतर एकाच वर्षात त्याच्यात वाद सुरू झाला. घरातील लोकांशी पटत नसल्याची मयुरी यांची तक्रार होती. त्यामुळे घरातील लोकांसोबत मयुरीचे नेहमीच खटके उडत होते. त्या वादामुळे ती नवर्‍याला सोडून माहेरीही गेली होती. त्यानंतर चार महिन्यापासून मयुरी व मयुर त्यांच्या मुलासह विंग हॉटेल परिसरातील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता. मात्र त्याच्यात वरचेवर वाद होत होता. तसा वाद 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीही सुरू होता.

त्यावेळी रागात  मयुर याने पत्नीला मारहाण केली. त्या रागातच त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळला. त्यात मयुरीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयुरने त्याची सगळी हकीकत फिर्यादी विशाल कणसे याला सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्याची फिर्याद घेतली आहे. विशाल कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीत काल मध्यरात्री मयुरने फोनवरून सांगितले की, त्याने मयुरीचा गळा आवळून खून केला आहे. ती लय बोलायला लागल्याने मी तिचा गळा आळवून खून केला आहे. तशीच माहिती विशालने पोलिसांना दिली. त्यानुसार मयूर वर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयुरचा फोन आल्याने विशाल त्वरीत तेथे पोहोचला. त्याच्यासोबत मयुरचा भाऊ महेश कणसेही होता. त्या दोघांनाही मयुरीला आवाज देवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची काही हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी गावातील काही जणांच्या मदतीने मयुरीला कारमधून येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयुरीला डॉक्टरांनी तपासले. त्यावेळी तिचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी व उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. पोलिसांनी पती मयुर यास अटक केली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
‘चला जाणूया वनाला’ निसर्ग पर्यटन योजना

संबंधित बातम्या