छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी : ऐतिहासिक नगरी सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा शुभारंभ आज (दि. १) ध्वजारोहणाने उत्साही वातावरणात झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ९९व्या साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्य पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीत तसेच राज्यगीत सादर केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनतर्फे फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, कवी विठ्ठल वाघ, मराठी विश्र्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आदी उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी ध्वजारोहणासह कवीकट्टा, प्रकाशनकट्टा यांचेही उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते कवीकट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले.
भालचंद्र जोशी म्हणाले, शाळकरी जीवनापासून कवितेशी संबंध आला कारण माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. मराठी साहित्यातील अनेक मोठे कवी पाठ्यपुस्तकांतून माहिती झाले. त्यांच्या सर्व कविता त्या वयात कळल्या, असे म्हणता येणार नाही. पण आता त्यांचे अर्थ समजतात. केशवसुतांची तुतारी आज कळू शकते. ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’, असे केशवसुतांनी म्हटले आहे. ते किती अन्वर्थक होते आणि औचित्याचे आहे, हे आज कळते. सामाजिक परिस्थिती बदलते, कवी तसा प्रतिसाद देत राहतात. व्यावसायिक आयुष्यात नीतिमत्ता, चारित्र्य, समता व दर्जा अशी मूल्ये मानून वाटचाल सुरू आहे.
संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, उद्योजकांच्या माध्यमातून संमेलन लोकाभिमुख होण्यास मदत होत आहे. जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन केले.
कवीकट्टा बहरला...
कवीकट्ट्यासाठी महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, १७६२ कवितांमधून ४५० कवितांची निवड कट्ट्यासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये बृहन्महाराष्ट्रातील १४० कविता आहेत. जपान आणि आबुधाबी येथूनही एकेक कविता आली आहे. २२ तास २२ सत्रांत कवीकट्टा सुरू राहणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.