सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे प्रमुख उपस्थिती आहे. या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून 1000 कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रिपाईचे सक्रिय सदस्य रिपाइं मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, अण्णा वायदंडे, युवा मोर्चा आघाडीचे नेते प्रतीक गायकवाड, रिपाइं सातारा तालुका अध्यक्ष आप्पा तुपे, रिपाइं महिला आघाडीच्या पूजा बनसोडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
अशोक गायकवाड पुढे म्हणाले, रिपाई आठवले गटाचा वर्धापन दिन दि. ३ ऑक्टोबर रोजी महाड येथे साजरा होत आहे. सातारा जिल्ह्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 1000 कार्यकर्ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यातून रवाना होणार आहेत. त्या संदर्भात शासकीय विश्रामगृहांमध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. महाड येथील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून भीमवंदना करण्यात येणार आहे तसेच वर्धापन दिनाच्या निमित्ताने रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आमची राजकीय क्षमता दाखवून देऊ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भाने महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रिपाईच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही तसेच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती तसेच प्रादेशिक मंडळांमध्ये सुद्धा रिपाईच्या कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी खंत अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली. या संदर्भात आम्ही आमचे नेते रामदास आठवले यांच्याशी चर्चा करू तसेच गेल्या वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. महायुतीमध्ये रिपाइला नेहमीच सन्मानाची भूमिका मिळावी ही आमची मागणी आहे मात्र त्याचे पालन होत नाही. परिणामी पुढील निवडणुकांमध्ये आम्ही आमची राजकीय क्षमता दाखवून देऊ, असा इशारा गायकवाड यांनी दिला.