खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ; सुषमा अंधारेंनी 'तो' जुना पुरावा काढला बाहेर

by Team Satara Today | published on : 18 March 2026


मुंबई : स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला महिला अत्याचार प्रकरणी अटक झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट जुने कागदपत्रे आणि पुरावे सादर करत चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खरातच्या काळ्या कृत्यांची आपल्याला कल्पना नव्हती, असा दावा चाकणकर यांनी केला असला तरी, अंधारे यांनी त्यांना 'क्रमांक एकच्या खोटारड्या' ठरवत हा दावा खोडून काढला आहे.

​कॅप्टन अशोक खरात याच्या संस्थेशी निगडित असलेल्या रूपाली चाकणकर यांनी यापूर्वी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, शिवनिका संस्थान हे एक देवस्थान ट्रस्ट असून सामाजिक कार्यासाठी आपण त्याच्याशी जोडले गेलो होतो, मात्र खरातच्या वैयक्तिक आयुष्यातील कारनाम्यांची आपल्याला पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक ट्विट करत चाकणकर यांना या प्रकरणाची माहिती किमान एक वर्षापासून असल्याचा दावा केला आहे. अंधारे यांच्या मते, 'खबरदार पुढारी' या स्थानिक वृत्तपत्राने जेव्हा खरातची दुष्कृत्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा चाकणकर यांनीच संबंधित पत्रकारावर कायदेशीर कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता.

​अंधारे यांनी या माफीनाम्याचा संदर्भ देत थेट सवाल उपस्थित केला आहे की, ज्या चाकणकर आज माहिती नसल्याचा बनाव करत आहेत, त्या या जुन्या माफीनाम्याबाबत काय बोलणार? इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जर पक्षाच्या प्रतिमेची काळजी असेल, तर अशा वादग्रस्त व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी का ठेवले आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या खरात सारख्या प्रवृत्तीला चाकणकर यांनी पाठीशी घातल्याचा घणाघाती आरोप आता अंधारे यांनी केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात रूपाली चाकणकर यांच्यासमोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, या वादाने आता पूर्णतः राजकीय वळण घेतले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किल्ले रायगडावर शौर्य-अभिमान दिवस उत्साहात; समशेरबहाद्दर राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमास अभिवादन
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध - जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांची माहिती नियंत्रण कक्षाला कळवा

संबंधित बातम्या